एक सरोवर होते. त्यात एक मगर आणि एक खेकडा राहत होते. ते दोघे जिवलग मित्र होते. त्या दोघांना मासे खायला खूप आवडत असत. त्या सरोवरात खूप मासे होते. दोघे मित्र रोज पोटभर मासे खात असत. त्यामुळे सरोवरातील मासे हळूहळू कमी होऊ लागले. कोणताही प्राणी सरोवरावर पाणी पिण्यासाठी आला, तर त्याला पकडण्यात मगर तरबेज होती. परंतु दररोज काही अशी शिकार मिळू शकत नव्हती.
आता मगर आणि खेकड्याला काळजी वाटू लागली. मगर म्हणाली, “खेकडेभाऊ, आपण एक काम करूया. मी मेल्याचं सोंग करते. मी मेले असल्याची बातमी तू सर्वांना जाऊन सांग. जेव्हा जनावरांना ही बातमी समजेल.. तेव्हा ते सरोवरावर पाणी पिण्यासाठी येऊ लागतील आणि आपल्या पोटापाण्याची सोय होईल.”
खेकडा लगेच मगरीच्या मृत्यूची बातमी पोचवायला बाहेर पडला.
त्याला सर्वांत पहिले एक कोल्हा भेटला. खेकडा म्हणाला, “कोल्हेभाऊ, तुझ्यासाठी मी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरोवरातली मगर मरण पावली आहे. तू आता सर्वांना सांग की, ताजं गोड पाणी पिण्यासाठी सरोवरावर जायला आता कोणाचीही भीती राहिली नाही. “
कोल्हा चलाख होता. तो म्हणाला, “अरेरे! बिचारी मगर मेली. चल, बघायला येतो.”
जिथे मगर मेल्याचे ढोंग करून पडली होती, तिथे खेकड़ा कोल्ह्याला घेऊन गेला. मगरीला असे पडलेले पाहून कोल्हा म्हणाला, “अरे, असं कसं होऊ शकेल? कोणतीही मगर जेव्हा मरते, तेव्हा मरणानंतरसुद्धा तिची शेपटी हलत राहते. हिची शेपटी तर जरासुद्धा हलत नाही !”
मगर हे बोलणे ऐकत होती. तिने लगेच आपली शेपटी हलवायला सुरुवात केली. हे पाहून कोल्हा खेकड्याला म्हणाला, “कोणतीही मगर मेल्यानंतर तिची शेपटी कधी हलू शकते काय? मेलेला प्राणी तर कधीच हलू-फिरू शकत नाही. या मगरीला तर ऐकायलासुद्धा येतंय. मगरबाई, तुझो चलाखी मला समजली बर का! निघतो मी. राम राम.” एवढे बोलून कोल्हा तेथून निघून गेला.
खेकडा आणि मगर परत जाणाऱ्या कोल्ह्याकडे उदासपणे पाहताच राहिली.